पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी झारखंड राज्यातील रांची येथे पुणे पोलिसांनी बुधवारी सकाळी फादर स्टेन स्वामी यांच्या घरी छापा घातला असून सर्च सुरु केला आहे. पोलिसांनी डिजिटल डिव्हाईस व इतर काही साहित्य हस्तगत केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी याला दुजोरा दिला आहे.
शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला हिंसाचार झाला होता. एल्गार परिषदेत बंदी असलेल्या माओवाद्यांचा समावेश असल्याच्या कारणावरुन पुणे पोलिसांनी यापूर्वी ५ माओ समर्थकांना अटक केली होती. त्यावेळीही रांचीमधील फादर स्टेन याच्या घरी पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. त्यामुळेही स्वामी यांची घरी चौकशी केली होती. मात्र त्यावेळी त्यांना अटक केली नव्हती.
बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी पाच विचारवंतांना यापूर्वीच अटक केली आहे. पुणे पोलिसांनी आज सकाळी रांची येथील स्टेन यांच्या घरी छापा घातला आहे. पुणे पोलिसांनी स्टेन च्या घरावर छापा घातला असून सर्च मोहिम हाती घेतली आहे. या सर्च मोहिमेत काही हाती लागले का याची अद्याप माहिती मिळाली नसल्याचे पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी सांगितले.
फादर स्टेन स्वामी हे मुळचे केरळचे रहिवासी असून ते गेल्या ५० वर्षांपासून झारखंडमध्ये चाईबासा येथे राहून आदिवासी संघटनांसाठी काम केले आहे़ ते या परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. २००४ मध्ये झारखंडची निर्मिती झाल्यानंतर ते रांची येथे आले. त्यांनी ‘नामकुंम बगेईचा’ या आदिवासींच्या अधिकारासाठी काम करणाऱ्यां संघटनेत काम केले़ सध्या ते नक्षकवादाचा ठपका ठेवून तुरुंगात टाकण्यात आलेल्या आदिवासी कैद्यांसाठी ते काम करत आहे. त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक माओवाद्यांशी जोडले जात असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.