मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनापूर्वी मुंबईतल्या दादर येथील चैत्यभूमीवर भीमज्योत उभारण्याचा संकल्प राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला होता. ही भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून येत्या १५ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे भूमीपूजन होईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हुतात्मा चौकाच्या धर्तीवर या भीमज्योतची उभारणी केली जाणार आहे. मंगळवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत भीमज्योतला मान्यता देण्यात आली आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापालिका अधिकारी, आंबेडकरी संघटना, चैत्यभूमी समन्वय समितीचे सदस्य, आमदार कालिदास कोळंबकर आणि भाई गिरकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
दररोज शेकडो लोक चैत्यभूमीला भेट देतात. तसेच १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि ६ डिसेंबर रोजी पुण्यतिथीनिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. हे सर्व अनुयायी या भीमज्योतीलाही अभिवादन करु शकतील.
अशी असेल भीमज्योत
चैत्यभूमीवरील अशोक स्तंभासमोर चौथरा उभारून त्याला सुरक्षित असे काचेचे संरक्षित आच्छादन केले जाणार असून ही ज्योत अखंड तेवत राहील. मान्यवर शिल्पकार दीपक पाटकर हे काम करणार आहेत.