मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. अशात राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे असे दिसत आहे. आज(बुधवार दि 28 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात 25 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सवानंतर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते. याआधी मंत्रिमंडळाच्या किमान 3 बैठका होणार आहेत. आजच्या बैठीकत सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
1) मुंबई येथे हैद्राबाद(सिंध) नॅशनल कॉलिजिएट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास मान्यता.
2) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. अवैध साठा, विक्री केल्यास शिक्षेत वाढ
3) मिशन मंगल या हिंदी सिनेमासाठी राज्य जीएसटी कराच्या परताव्यासाठी शासन निर्णय काढण्यास मान्यता.
4) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48(8) सुधारणा.
5) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनयिम 1960 चे कलम 24 अ मध्ये सुधारणा करण्याबाबत अध्यादेश पुन्हा जारी करण्यास मान्यता
6) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा. सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी मिळणार
7) वर्धा येथे नवीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरु करण्यास मान्यता
8) आदिवासी विभागाच्या कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या अनुदानित आश्रमशाळा ठाणे जिल्ह्याच्या कल्याण येथील अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेस हस्तांतरीत व स्थलांतरीत करून आदिम जमान्यातील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालवण्यास मान्यता.
9) राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनातर्फे खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोन सहकारी साखर कारखान्यांना उपलब्ध करण्यात येणार आहे.
10) नाशिकच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज स्वरूपात निधी मिळवण्यासाठी शासन हमी.
11) नागपूरच्या मौजा बिनाकी येथील बिनाकी हाऊसिंग स्कीममधील झोपडपट्टी वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या लाभात होणाऱ्या दस्तावरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंजुरी
12) मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या टप्पा 2 व 3 ला मंजुरी
13) राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात वाढ
14) सदनिकांच्या मालकी अधिकाराची नोंद अभिलेखात घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम 2019 नव्याने तयार करण्यात येणार आहे.
15) शासकीय आश्रमशाळांचे इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय
16) नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पांतर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्यास मान्यता.
17) मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समूह पद्धतीने पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा
18) पर्यटन प्रकल्पांना देय असलेली वित्तीय प्रोत्साहने वितरीत करण्याबाबत
19) महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक अंतर्गत एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिले ते पाचवीचे वर्ग सुरु करण्यात येणार
20) नागपूरच्या मिहान प्रकल्पास सुधारीत प्रशासकीय व वित्तीय मान्यता
21) कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्र सुरु करण्यास मान्यता.
22) राज्यातील शहरांमधील विघटनशील (ओल्या) कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान
23) बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाला तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता
24) विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता
25) शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद आणि शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील आंतरवासितांचे विद्यावेतन सहा हजारांवरून अकरा हजार रुपये.