मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – निवडणुका जवळ आल्या की, अनेक नेते पक्षांतर करताना दिसतात. एकेकाळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले दोन दिग्गज नेते आता पुन्हा पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे मातब्बर नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना तर राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या मतभेदांमुळे नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तर पक्षांतर्गत काही हेव्यादाव्यांमुळे 28 वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांनी शिवसेनेला राम राम ठोकला होता. दोन्हीही नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. परंतु छगन भुजबळ आधी काँग्रेसमध्ये तर नंतर राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. परंतु नारायण राणे मात्र काँग्रेसमध्येच राहिले. त्यांनी पक्षांतर केलं तेव्हा देशात काँग्रेसचं सरकार होतं. 2014 नंतर मात्र देशातील राजकीय परिस्थितीत बदल मोठा झाला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांना तुरुंगात जावे लागले तर नारायण राणे हेही काँग्रेसवर नाराज होत काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली.
यानंतर आता एक नेता भाजपमध्ये जाण्यच्या तयारीत आहे तर एक नेता घरवापसी करणार आहे. दरम्यान छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच ते शिवबंधन बांधतील अशी माहिती आहे. तर नारायण राणे यांनी मात्र भाजप प्रवेशाबाबत खुलासा केला आहे. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यानंतर राणे यांनी भाजप प्रवेशाची तारीख जाहीर केली. 1 सप्टेंबर रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्तांना त्यांनी पत्रकाराशी बोलताना दुजोरा दिला आहे.