नवी दिल्ली वृत्तसंस्था : राजधानी दिल्लीमध्ये एका पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेनं इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात या गर्भवतीनं आत्महत्या केली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती गोविंदला अटक केली आहे. दिल्लीतील रोहिणी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव असून घराच्या गॅलरीतून उडी मारून तिने आपलं जीवन संपवलं. गंभीर जखमी झालेल्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. संगीताच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला गेल्याचा आरोप तिच्या सासरच्या मंडळींवर केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वीही संगीताचं तिच्या पती गोविंद सोबत वाद झाला होता. मात्र घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट किंवा काहीही ठोस पुरावा आढळून आलेला नाही. दरम्यान, २०१८ मध्येच संगीता आणि गोविंदचं लग्न झालं होतं.