मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सर्व फ्लॅटधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच तुम्ही तुमच्या फ्लॅटच्या जमिनीचे मालकर असणार आहात. मुंबई , पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर किंवा इतर शहरांमध्ये राहणाऱ्या फ्लॅटधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारने इमारतीमधील फ्लॅट आणि जागेची नोंदणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक फ्लॅट धारकांना बिल्डिंगच्या जमिनीचे मालक असल्याचा लाभ मिळेल.
हा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक बुधवार रोजी पार पडली. आतापर्यंत बिल्डिंगमधील फ्लॅटधारकांचा केवळ आपल्या घरावर मालकी हक्क होता, परंतु ते ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्याच्या प्रॉपर्टी कार्डवर त्याचं नाव नसायचं. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर आता त्या फ्लॅटधारकाला आपल्या फ्लॅटसोबतच बिल्डिंगचा मालक असल्याचा पुरावा मिळणार आहे. याचा फायदा राज्यभरातील सुमारे एक लाखांपेक्षा जास्त असलेल्या बिल्डिंगमधील जवळपास तीन कोटी फ्लॅटधारकांना मिळणार आहे. याआधी फ्लॅटच्या खरेदीची नोंदणी केवळ रजिस्ट्रार कार्यालयात व्हायची. बिल्डिंग मध्ये कितीही लोक राहत असले तरीही मूळ जागेच्या सातबारावर बिल्डरचा किंवा मूळ जागा मालकाचा हक्क असायचा. त्यामुळे सोसायटीची स्थापना झाल्यानंतर फ्लॅटधारक कन्वेयन्स डीडसाठी बिल्डरच्या मागे लागायचे.
कन्वेयन्स केल्यानंतर ही जमीन सोसायटीच्या मालकीची व्हायची, पण ती फ्लॅटधारकाच्या नावे होत नसे. परंतु या निर्णयानंतर बिल्डिंगच्या जमिनीवर फ्लॅटधारकांची मालकी राहिल. त्यासाठी फ्लॅटधारकाकडे नेमकं किती क्षेत्रफळ आहे, यावरुन जागेच्या मालकीचं प्रमाण ठरेल. सध्या या कायद्याचं प्रारुप ठरवण्याचं काम सुरु आहे. नियमावली बनवल्यानंतर ती सूचना आणि हरकतींसाठी ठेवली जाईल आणि नंतर त्याचं कायद्यात रुपांतर करण्यात येईल.