कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – पश्चिच महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पुन्हा एक मोठा धक्का बसणार आहे. कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभेतील उमेदवारच आता पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. महाडिक पु्न्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी महाडिक यांना उमेदवारी दिली होती. त्यांना कोल्हापूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यास काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांसह राष्ट्रवादीचा विरोध होता. परंतु शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यांना या निवडणुकीत पराभव सहन करावा लागला होता. देशातील मोदी लाट आणि काँग्रेसच्या सतेज पाटलांविरोधात त्यांनी काम केलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यानंतर आता कोल्हापूरमधील एक ताकदवान नेता पक्ष सोडत असल्याने पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. मुंबईत तळ ठोकून असलेल्या महाडिक यांच्या भाजप प्रवेशाची तारीख उद्या निश्चित होणार आहे.
आतापर्यंत महाडिकांनी 2 वेळा मुख्यमंत्र्याची भेट घेतली आहे. मे महिन्याच्या अखेरीसही त्यांनी भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु होती. त्यांनी मात्र ही चर्चा फेटाळली होती. साखर कारखान्यांच्या कामसाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असे त्यांनी म्हटले होते. यानंतर आता विधानसभेला काही दिवस असतानाच महाडिक भाजपत प्रवेश करणार आहेत.