सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तशी राष्ट्रवादी आणि इतर पक्षांना लागलेली गळती सुरुच आहे. अनेक दिवसांपासून शिवसनेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा असलेले बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला अखेर सोडचिठ्ठी दिली आहे. लवकरच ते आता शिवसेनेत जाणार आहेत. कार्यकर्त्यांसमोर त्यांनी याबाबत घोषणा केली आहे.
येत्या 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता मातोश्रीवर शिवसेना प्रवेशासाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत सांगताना दिलीप सोपल यांनी म्हटले आहे की, बार्शीचे राजकारण बघता हा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी राष्टावादीकडून सुरुवात झाली आहे. या मुलाखतीला दिलीप सोपल यांनी दांडी मारली होती. यानंतर त्यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. अखेर या चर्चांना दिलीप सोपल यांनी पूर्णविराम दिला आहे.
आमदार दिलीप सोपल यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत शिवसेनेतून भाजपत गेले आहे. त्यामुळे आता दिलीप सोपल यांचा मार्ग मोकळा झाला आहे. असेही बोलले जात आहे की, भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपात बार्शी विधानसभेची जागा शिवसेनेकडे येते. त्यामुळेच आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.