पुणे : बहुजननामा ऑनलाईन- पुण्यातील मेहेंदळ गॅरेज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे होर्डिंग लावण्याच्या वादातून कोथरुडच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी आणि तिकीटासाठी इच्छुक नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. अगदी मोबाईल फोडणे, कानशिलात मारणे, डोके फोडेपर्यंत या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली. वादानंतर मात्र दोन्ही बाजुनी शांत राहणे पसंत केले असे दिसत आहे कारण पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झाल्याचे दिसत नाही.
यानंतर मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “कार्यकर्त्यांचा जीव होर्डिंगपेक्षा जास्त मोलाचा आहे. चूक नसतानाही आम्ही समंजसपणे प्रकरण हाताळले. ही घटना पक्षातील वरिष्ठांना कळवली आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दुसरीकडे मोहोळ म्हणाले की, “परवानगीनेच होर्डिंग लावले होते. मात्र दादागिरी करून त्यावर आमदार मेधा कुलकर्णींचे होर्डिंग लावले गेले. तरीही आम्ही शांत बसलो.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सदर वादावरून भाजपमध्ये तिकीटासाठी रस्सीखेच होत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांची महाजनादेश यात्रा आज(शनिवार दि 14 सप्टेंबर) पुण्यात असणार आहेत. खास बसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस संध्याकाळी पूर्ण शहरात फिरणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठीच शहरात होर्डिंग लावण्यात आले आहेत. पुण्यातील सर्व 8 ही आमदार हे भाजपचेच आहेत.