नवी दिल्ली : वृत्तसंस्था- स्वयंपाकाचा गॅस वापरणार्या ग्राहकांना नवीन वर्षाच्या पाहिल्याच दिवशी महागाईने दणका दिला आहे. कारण घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा एकदा महागला आहे. लागोपाठ पाचव्या महिन्यात सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे.गॅस कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर (14.2 किलो) च्या दरात 19 रूपयांची वाढ केली आहे.
आता घरगुती गॅस सिलेंडर 749 झाला आहे. तर व्यावसायिक सिलेंडर (19 किलो) वर 29.50 रुपयांची वाढ झाली आहे. आता व्यावसायिकांना सिलेंडरसाठी 1325 रुपये मोजावे लागणार आहेत. तर पाच किलोच्या छोट्या सिलेंडवर 7 रूपये वाढल्याने तो आता 276 रूपयांना मिळणार आहे. यावेळेस घरगुती गॅस ग्राहकांच्या खात्यामध्ये 238.10 रुपये अनुदान येईल. वाढलेले दर बुधवारी सकाळपासून लागू झाले आहेत.
ऑगस्ट 2019 मध्ये 611 रूपये होता घरगुती सिलेंडर
ऑगस्ट 2019 मध्ये 611.50 रुपयांचा असणारा गॅस सिलेंडर, जानेवारी 2020 मध्ये 749 रूपये झाला आहे. म्हणजे मागील 5 महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या बाजार भावात 137 रूपये वाढले आहेत. तर व्यावसायिक सिलेंडरवर 230 रूपये वाढले आहेत.
सिलेंडरचे दर
14.2 किलो – 749.00 रुपये
19 किलो – 1325.00 रुपये
05 किलो – 276.00 रुपये
जानेवारी 2019 मध्ये 724 रूपये होता सिलेंडर
मागील वर्षी 1 जानेवारीला घरगुती गॅस सिलेंडर (14.2 किलो) बाजार भावाप्रमाणे 121 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरवर 190 रुपये कमी झाले होते. यामुळे घरगुती गॅस सिलेंडर 724 रूपये आणि व्यावसायिक सिलेंडर 1286.50 रुपये झाला होता.
Visit : bahujannama.com