मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले असून त्यांना वित्त खाते भेटण्याचीही शक्यता आहे. परंतु रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमुळे ते नाराज असल्याची चर्चा सगळीकडे होत आहे. परंतु यावर आता रोहित पवार यांनी स्वतःच यावर पडदा टाकला आहे.राज्यात अनेक लोकं फिरत आहेत, त्यात मीसुद्धा आहे. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही. नाराजी बाजूला ठेऊन काम करायचं आहे. मला मंत्रिपद मिळावं यासाठी ज्यांनी कोणी प्रयत्न केले असतील त्यांचा मी आभारी आहे, असे रोहित पवार एका वृत्तवाहीनीसोबत बोलताना म्हणाले. तसेच लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची क्षमता प्रत्येक तरुणामध्ये आहे.
जी जबाबदारी आपल्यावर सोपवली असते ती समर्थपणे पार करण्याची क्षमता प्रत्येक युवकांमध्ये असते. त्याच युवकांमध्ये मीसुद्धा येतो, असा माझ्या फेसबुक पोस्टचा अर्थ आहे. पहिल्यांदाच नगरमधून आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. राज्यात असलेली महाविकास आघाडी नगरमध्येही दिसत आहे. लोकांच्या हितासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा विजय हा त्या लोकांचाच होतो. आज या ठिकाणी महाविकास आघाडीचाच विजय होईल, असेही रोहित पवार म्हणाले.पण याअगोदर रोहित यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. मंत्रिमंडळात समावेश झालेल्या सर्व मंत्र्यांचे मनापासून अभिनंदन. ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजणांना दिलेली जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे सर्वसामान्यांच्या हितासाठी पार पाडतील, असा मला वाटत. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, कर्जत-जामखेड या माझ्या मतदारसंघातील मतदार तसेच पक्षातील ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकास माझा समावेश मंत्रिमंडळात व्हावा, असे वाटत होते.
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आपण ज्यांना आदरार्थी मानतो अशा ज्येष्ठांनी दिलेला सल्ला नेहमीच अंतिम असेल, मात्र लाथ मारेल तिथे पाणी काढून दाखवण्याची क्षमता ठेवूनच मी आजवर काम करत असून इथून पुढेही सर्वसामान्यांच्या हितासाठीच दुप्पट वेगाने कार्यरत राहील. आजवर मला मिळालेल्या प्रत्येक संधीच सोन करण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात अधिकाधिक अनुभव घेऊन कार्यरत राहत आपला विश्वास कायम ठेवण्याचा मी प्रयत्न मी करेल. सर्व खात्यांच्या मंत्र्यांसोबत सहकार्याची भावना ठेवून मतदारसंघासोबतच एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून मी राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल. लोकप्रतिनिधी या नात्याने अधिकाधिक अनुभव घेऊन कार्यरत राहील. पुन्हा एकदा नवनियुक्त मंत्रिमंडळाचे विशेषतः ज्या युवक प्रतिनिधींना ही संधी मिळाली त्यांचे हार्दिक अभिनंदन, असेही रोहित पवार म्हणाले.
Visit : bahujannama.com