नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – देशात निवडणुका सुरु असून एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहेत पैकी चार टप्प्यातील मतदान पार पडले असून राजधानी दिल्लीत १२ मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मतदानाआधीच आमआदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी धक्कादायक आरोप केला आहे. ते म्हणाले कि , भाजपने ‘आप’चे सात विद्यमान आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु असून प्रत्येक आमदारांना मोठ्या रकमेची ऑफर दिल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपच्या आमदारांना प्रत्येकी दहा कोटींची ऑफर भाजपकडून देण्यात आली आहे.भाजपला दिल्लीत सरळसरळ पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अश्या प्रकारची आमिष देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा सिसोदिया यांनी केला. परंतु भाजपने पराभवापासून वाचण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न करू नये, याआधी देखील भाजपकडून असा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. परंतु, भाजपच्या या प्रयत्नाला जनता चोख प्रत्युत्तर देईल, असंही सिसोदिया यांनी सांगितले.दरम्यान ,दिल्लीत येत्या १२ मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दिल्लीत एकून सात लोकसभा मतदार संघ असून आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत रंगणार आहे.