कोलकत्ता : वृत्तसंस्था – सोमवारी कोलकात्यामध्ये एका ट्रान्सजेंडर जोडप्याने विवाह केला. समुहामधील कोलकात्यातील ही पहिलीच घटना असून तीस्ता दास आणि दीपन चक्रवर्ती असे या ट्रान्सजेंडर दाम्पत्यांचे नाव आहे. या दाम्पत्याने एप्रिल महिन्यातच आपल्या लग्नाची घोषणा केली होती. ३८ वर्षीय तीस्ता कोलकात्यामधील ट्रान्सजेंडर समूहातील लोकप्रिय नाव आहे. तीस्ताने अनेक टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ४० वर्षीय दीपन हा आसामचा रहिवासी आहे. मागील काही वर्षांपूर्वी या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर जीवनसाथी बनण्याची घोषणा त्यांनी या एप्रिल महिन्यात केली होती.
पश्चिम बंगालमधील मतदान कार्ड असणाऱ्या तीस्ता या पहिल्या ट्रान्सजेंडर आहेत. तीस्ता यांनी या लग्नाविषयी बोलताना सांगितले की, आम्ही खूप आनंदी आहोत. फक्त आम्हीच नाही तर आम्हाला पाठिंबा देणारेही खूप आंनदी आहेत. आमच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. सामाजिक भान जपत या नात्याला पुढे नेणे फार कठीण होते. म्हणून आजचा हा दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचा आणि खास आहे. आम्ही आमचा साथीदार निवडल्यानेही फार आनंदी आहोत. या लग्नापासून दीपनच्या परिवाराने दूर राहणे पसंद केले असले तरी तीस्ता यांच्या आई मात्र त्यांना मजबूत समर्थन देत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. तीस्ता यांचा जन्म सुशांतो दास म्हणजेच मुलाच्या रूपात झाला होता. परंतु तीस्ता यांनी २००४ मध्ये सर्जरी करून ट्रान्स- वुमेन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. कोलकत्यातील अनेक ट्रान्स जेंडर या दोघांच्या लग्नात सहभागी झाले होते.
दरम्यान या लग्नात पश्चिम बंगाल ट्रान्सजेंडर बोर्डाच्या सदस्या रंजिता सिन्हा यांनी देखील सहभाग नोंदविला होता. या लग्नाविषयी बोलताना रंजिता म्हणाल्या की, तीस्ता या फार काळापासून या संघर्ष कमिटीच्या सदस्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी या व्यक्तींना मिळणारे अधिकारांविषयी नागरिकांमध्ये असणारे गैरसमज याविषयी चिंता व्यक्त केली. तसेच ते म्हणाले, भारतात अजूनपर्यंत आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराविषयी लोकांमध्ये जागृती नाही. तर ट्रान्सजेंडर लोकांच्या समस्या कळण्यासाठी आणि समजण्यासाठी आम्हाला फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे.