मुंबई बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीबाबात वेगवेगळे आरोप करत बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंच्या जागी आता प्रा. किसन चव्हाण हे वंचितच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य असणार आहेत. पक्षाने लक्ष्मण मानेंच्या जागी त्यांची नियुक्ती केली आहे. यापुर्वी लक्ष्मण माने, अशोक सोनोने, अण्णाराव पाटील हे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पुण्यात २० जून २०१९ रोजी पार पडली होती. त्या बैठकीत वंचितच्या पार्लमेंटरी बोर्डाची स्थापना करण्यात आली. त्यात लक्ष्मण माने, अड. अण्णाराव पाटील. अशोकराव सोनेने यांची पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवासांतच लक्ष्मण माने यांनी वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करत वंचित बहुजन आघाडीतून काढता पाय घेतला. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यात अशोक सोनोने, अण्णाराव पाटील आणि रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या.
त्यानंतर आता पक्षाने मानेंच्या जाण्याने रिक्त झालेल्या पदावर किसन चव्हाण यांची नेमणूक केली आहे. तत्पुर्वी किसन चव्हाण यांची प्रदेश महासचिव म्हणून नियुक्ती पक्षाने केली आहे. त्यानंतर आता पार्लमेंटरी बोर्डाची देखील जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.