नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील जोधपूरच्या बी.जे.एस. कॉलनी (BJS Colony) मध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची कात्रीने हत्या केली. यानंतर पोलीस आणि सासरकडच्या लोकांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री या जोडप्यामध्ये जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपी विक्रम सिंग (वय 35) यांनी पत्नी शिव कंवर (30) हिचा खून केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, विक्रम सिंग हा मोबाईल फोनवर व्हिडिओ गेम खेळताना आढळला, तर त्याची पत्नी खोलीत रक्तामध्ये पडली होती.
महामंदिराचे एसएचओ कैलाशदान यांनी सांगितले की, महिलेला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. ते म्हणाले की, विक्रम बेरोजगार असल्याने अनेकदा या जोडप्यात भांडण होत असे. एसएचओने सांगितले की, आरोपी बेरोजगार होता, तर त्याची पत्नी घरी शिवणकाम करत असे. ते म्हणाले की, घटनेच्या दिवशी विक्रमने कात्री उचलली आणि पत्नीवर वार केले. पोलीस अधिकारी म्हणाले की, “जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी त्याच्या मोबाईल फोनवर कोणत्याही प्रकारची खंत न बाळगता व्हिडिओ गेम खेळताना आढळला.” त्यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी या जोडप्यास दोन मुले असून, ती घरात हजर नव्हती.
वधूने केली आत्महत्या
राजस्थानात हत्या व आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडेच, लग्नाच्या तीन दिवसांनंतर सीकर जिल्हा मुख्यालयात एका वधूने आत्महत्या केली. आपल्या सासरीच लाल ओढणीने तिने फाशी घेऊन जीवन संपवले. वधूच्या आत्महत्येच्या बातमीनंतर कुटुंबातील व परिसरातील लोक घाबरले होते. पोलिसांनी वैद्यकीय मंडळाकडून मृतदेहाचे शवविच्छेदन केले व नातेवाईकांच्या स्वाधीन केले. यावेळी आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.