पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीला अडीच वर्षांनंतर बेड्या ठोकण्यास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपी अडीच वर्षे फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.
भाऊ ऊर्फ दगडू सुरेश खोमणे (वय 2,7 रा. राहू, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिरूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 2018 मध्ये एका मुलीवर वारंवार बलात्कार केला आहे. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच आरोपी खोमणे फरार झाला होता.
दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी भाऊ खोमणे हा राहू गाव परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी राहू गाव परिसरात सापळा रचून सोमवारी (दि.7) रात्री अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गिरमकर, पोलीस नाईक मंगेश थिगळे, जनार्दन शेळके, अजित भुजबळ, राजू मोमीन यांच्या पथकाने केली.