रांची वृत्तसंस्था – फेसबुकवर मुस्लीम समाजाबाबत टीका केल्याप्रकऱणी एका महाविद्यालयीन तरुणीला कुराणच्या विविध संघटनांना वाटण्याच्या अटीवर जामीन देण्याचा आदेश झारखंड न्यायालयाने दिला होता. न्यायालयाने ट्वीटरवरील टीकेनंतर हा निर्णय बदलला आहे. नवीन आदेशानुसार सात हजार रुपयांचे दोन हमीपत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर जामीनकर्त्यांपैकी एक जण रांची जिल्ह्यातील तर दुसरा तिचा नातेवाईक असावा अशी अटक न्यायालयाने घातली आहे.
न्यायाधीश मनीष कुमार सिंह यांनी आरोपी रीचा भारती हिला जामीन मंजूर करताना हा आदेश दिला होता. त्यात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर स्थानिक अंजूमन समितीला कुराणची प्रत द्यावी तसेच आणखी चार प्रती आणखी चार वाचनालये किंवा महाविद्यालयातील वाचनालयांना द्याव्यात असे आदेशात म्हटले होते. या कुरणच्या प्रती संबंधित संस्थांना दिल्याची पोचपावतीही पंधरा दिवसात सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर अंजुमन समितीचे सदस्य महंमद जमील खान यांनी न्यायायलयाच्या आदेशाचे स्वागत केले होते.