कऱ्हान (बहुजननामा ऑनलाइन) – ग्राहकाला न विचारताच मिशा कापल्याने त्याने सलुन मालका विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही घटना नागपुर जिल्हातील कऱ्हान शहरात घडली आहे. घडलेल्या प्रकाराची एनसीआर कॉपी व फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने नागरिकांत हा विषय चर्चेचा ठरला.
कन्हान शहर युवा दणका संघटनेचे अध्यक्ष किरण किसन ठाकूर हे सुनील लक्षणे यांच्या फ्रेंड्स जेन्ट्स पार्लरमध्ये दाढी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी किरण यांना न विचारताच कारागिराने थेट त्यांच्या मिशांवरच वस्तारा फिरवला. ठाकूर यांना मिशी आवडत असल्याने त्यांनी घडलेला प्रकार व कारागिराची माहिती मोबाइलवरून दुकानमालक सुनील लक्षणे यांना दिली. परंतु त्यांनी ‘मुछकट गयी होगी तेरी। तेरे को जो करना होगा करले। मै तुझे देख लुंगा’, असे उद्धट उत्तर दिले. त्यामुळे ठाकूर यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार कन्हान पोलीस ठाण्यात दाखल केली. मिशा कापल्यामुळे आपल्या आवघडल्या सारखे वाटत आहे, असे किरण ठाकूर यांनी सांगितले.
या घटनेचे वृत्त सोशल मिडीयावर वायरल झाल्याने अनेकांनी यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक जण किरण ठाकूर यांना पाठींबा देत असून त्यांना न विचारताच त्यांच्या मिशा कापणाऱ्या कारागीरा विरोधात संताप व्यक्त करत आहेत.