बहुजननामा ऑनलाईन – जळगावातील अमळनेर येथील गांधीलपुरा भागात वेश्याव्यवसाय वस्ती बंद करण्यासंदर्भांत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात काही गंभाीर बाबी समोर आल्याने संबंधित विभागाच्या सचिवांना नोटीस बजावण्यात आली आहे. ठोस उपाययोजनांसह ९ सप्टेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधलीपुराचे स्थानिक रहिवासी कुदरतअली मोहम्मदअली आणि रफियोद्दीन शेख यांनी काही वर्षापुर्वी युथ फांऊंडेशनच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती. न्या. तानाजी नलावडे आणि न्या. के.के. सोनवणे यांच्या खंडपीठात याबाबत कामकाज सुरु आहे. त्याचप्रमाणे न्यायधिशांनी याचिकाकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सुचनाही दिल्या होत्या.
यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला काही निर्देश दिले आहेत. त्यात सामान्य नागरिकांना परिसरात होणाऱ्या गैरकृत्याचा त्रास होणार नाही, परिसरात कोणतेही बेकायदेशीर कृत्य होणार नाही, यासाठी स्थानिक प्रशासनाने खबरदारी घ्यावी. त्यासाठी ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत. अश्या प्रकारची गैरकृत्ये करणाऱ्यांच्या मालमत्ता, राहती घरे जप्त करावीत. या सर्वांचा अहवाल खंडपीठाला सादर करण्यात यावा. तसेच खंडपीठाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार कारवाई न झाल्यास संबंधित विभागाच्या सचिवांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल. असेही खंडपीठाने बजावले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. जी. के. थिगळे आणि सरकारी पक्षातर्फे अॅड. व्ही. सी. चौधरी कामकाज पाहत आहेत.
खंडपीठाने दिलेल्या निर्देशानंतर स्थानिक प्रशासनाने गांधलीपुरा परिसरात सोळा सीसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वेश्या व्यवसाय चालणाऱ्या या गल्ली आणि रस्त्यावर हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याठिकाणी आता उन्हापासून बचाव करण्यासाठी कॅमेऱ्याला लागूनच ग्रीननेट लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे गल्लीतून कोण ये-जा करते हे कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत नाही. अशी तक्रार त्यांनी केली आहे.