मुंबई बहुजननामा ऑनलाईन – जातीवाचक टिप्पणी, सततचा भेदभाव, अपमान यांना कंटाळूनच डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केल्याचा उलगडा त्यांच्या सुसाईड नोटमधून झाला आहे. पायल तडवी यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटचा उल्लेख आरोपींविरोधात दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये आहे. त्यातून हा उलगडा झाला आहे. डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्की मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी डॉ. पायल तडवी यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
भिल्ल जातीतील डॉ. पायल तडवी शिकण्यासाठी जळगावातून मुंबईत आली. नायरसारख्या हॉस्पीटलमध्ये शिकण्याची संधी मिळाली याचा आनंद तिला होता. त्यात मोठी स्त्रीरोग तज्ञ होण्याचं स्वप्न उराशी बाळगून पायल वयाच्या २६ व्या वर्षीय रुग्णालयात वरिष्ठांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपविण्याचा निर्णय घेते.
सुसाईड नोट मध्ये असं लिहिलं
मी यांच्याबरोबर (आरोपी डॉक्टर) आता एक मिनिटही राहू शकत नाही. गेले क वर्ष मी त्यांना सहन करत आहे. आता त्यांना सहन करणे अशक्य आहे. असे डॉ. पायल तडवींने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. आयुष्याचा शेवट हेच या जाचाला उत्तर आहे असे मानत तिने २२ मे रोजी आत्महत्या केली.
मैत्रिणीची साक्ष
पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महत्वाची साक्षीदार म्हणून स्नेहल शिंदे हिचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. त्यात तिने आरोपीने कशा प्रकारे त्रास दिला याची माहिती दिली.
स्नेहल शिंदे हिच्याशी पायलचे आत्महत्येपुर्वी तासभर संभाषण झाले. यात तिने काही तासांपुर्वी ऑपरेशन थिएटरमध्ये घडलेला प्रसंग कथन केला. पायलला मी शेवटचा कॉल सायंकाळी ४ वाजता केला होता. त्यावेळी तिने काही तासांपुर्वी ऑपरेशन थिएटरमध्ये घडलेला प्रसंग सांगितला. तिन्ही वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या समोर मोठ्याने ओरडून तिचा अपमान केला. त्यानंतर मला वाटते की तिने यामुळेच आत्महत्या केली. असे स्नेहलने सांगितले.
तर पायलच्या आई आबेदा तडवी यांनीही ३ वाजून ३९ मिनिटांनी तिला फोन केला होता. आत्महत्येच्या काही मिनिटांपुर्वी म्हणजे ४ वाजून ५१ मिनिटांनी तिचे आहुजाशी बोलणे झाले होते. त्यावेळी पायलच्या आईने फोन करून तिला पायल खुप तणावात असल्याचे मला सांगितले. पायलशी याबद्दल चर्चाही करण्यास सांगितले. त्यानंतर लवरच ती मुंबईला तिला भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.
तिनही आरोपी पायलला नॅशनल इलिजीबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्टच्या गुणांबाबत विचारत होत्या. ती अनुसुचित जमातीची आहे. हे त्यांना माहिती होते असे स्नेहल शिंदेन सांगितले. त्यानंतर पोलिसांनी भक्ती मेहेरची रुम पार्टनर डॉ. झेयान इशरत सय्यद हिचाही जबाब घेतला आहे. त्यात तिन्ही आरोपी पायल आणि तिची मैत्रिण स्नेहल शिंदे यांना जाणूनबूजून रुग्णांच्या नोंदी करण्याचे व अधिक काम देत होत्या. त्यामुळे त्या रडकुंडीला येत असत. असे तिने जबाबात सांगितले.
तर हेमा अधिक तापट आहे. ती बोलताना वरिष्ठांशीही अरेरावी करत असे.. हेमा भक्ती, अंकिता या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या पायल कामचोर आहे. अशी तक्रार करायच्या. त्या पायलला वारंवार अपमानित करत होत्या.
ऑक्टोबर नोव्हेंबर २०१८ मध्ये भक्ती, हेमा वॉर्ड नंबर सातमध्ये असताना मी वार्डच्या राऊंडवर होते. त्यावेळी हेमा रुग्णांच्या फाईल्समधील काही कागदपत्रे फाडत असल्याचे पाहिले होते. हा प्रकार आठवड्यात २-३ वेळा मी पाहिला होता. याबाबत मी विचारणा केली तेव्हा हेमाने मला यात पडू नकोस अशी तंबी दिली होती. तिचा हा तापट स्वभाव पाहता मी तिला सांगितले होते की, तुमच्या स्वभावामुळे तुमची ज्यूनियर आत्महत्या करेल, तुमची बाजू मात्र त्यावेळी कोणी घेणार नाही. असेही सय्यद हिने जबाबात सांगितले आहे. तर पायलच्या आत्महत्येच्या दिवशी हेमाने आपल्याला याची साधी भणक लागू दिली नाही. रुग्णालयात २२ मे रोजी मी ड्युटीसाठी जात असताना काही सहकाऱ्यांनी पायलने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर हेमा एका कचराकुंडीजवळ उभी असल्याचे मी पाहिले असे तिने सांगितले.
तर याप्रकरणी पोलिसांनी १६० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात रुग्णायलयाच्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविल्यावर त्यातील तीन जणांनी पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपी पायल तडवी हिला तिच्या जातीवरून नेहमी अपमानित करत होत्या. तसेच तुमची लायकी फक्त क्लार्क बनायची आहे. असा टोमणा एका आरोपीने पायलला मारल्याचे सांगितले.