मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. काही जण इंदुरीकर महाराजांना पाठिंबा देत आहेत तर काहीजण त्यांच्याविषयी टीका करीत आहेत. हे प्रकरण गाजल्यानंतर इंदुरीकर महाराज यांना पाठिंबा देण्यासाठी तरुणांकडून सोशल मीडियावर मोहीम देखील सुरु करण्यात आली आहे. अशातच अंनिसचे नरेंद्र दाभोळकर यांचे चिरंजीव हमीद दाभोळकर यांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.
त्यांनी चूक दुरुस्त करून घ्यावी…
याबाबत बोलताना हमीद दाभोळकर म्हणाले की, इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर अनेक चर्चा सुरु आहे, त्यांनी जे विधान केले हे तर अशास्त्रीय स्वरुपाचं विधान आहे. मुलाचं आणि मुलीचं लिंग असं ठरत नाही हे विज्ञानाने स्पष्ट केलं आहे. महिलांबद्दल त्यांचे बोलणं अनेकदा आक्षेपार्ह म्हणलं जाऊ शकतं असं त्यांनी सांगितले. पण एकाबाजूला कायदेशीररित्या काही गोष्टी गुन्हा होत असल्यातरी इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये समाज प्रबोधनाच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी मांडतात. आणि आपल्यामध्ये एखादी चूक असेल ती दुरुस्ती करुन घेणे यात कोणताच कमीपणा नाही. त्यांनी ही चूक दुरुस्त करुन घ्यावी, यापुढे येणाऱ्या काळात एवढा मोठा समुदाय त्यांचे किर्तन ऐकतो, त्यांना विज्ञान नीट समजून सांगाव, स्त्री-पुरुष समतेचं मुल्य समजून सांगावं. त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातून अनेक लोकांना गैरसमजातून बाहेर काढण्याची त्यांना संधी मिळाली आहे. ही संधी त्यांनी घ्यावी असं आवाहन हमीद दाभोळकरांनी केलं आहे.
मी चुकीचे बोललो नाही : इंदुरीकर महाराज
कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर इंदुरीकर महाराज परखड मत व्यक्त करतात. मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकारानंतर इंदुरीकर महाराज उद्विग्न झाले. दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे काही बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे, असा खुलासाही इंदुरीकर महाराजांनी केला आहे.
काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज
स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’
काय आहे आरोप ?
मात्र हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप याच समितीच्या सदस्याने केला. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. इतकेच नाही तर या नोटीस नंतर जर पुरावे मिळाले तर इंदोरीकर महाराजांवर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे.