बहुजननामा ऑनलाईन – बॉक्सिंगमधील पहिले द्रोणाचार्य पुरस्कारविजेते प्रशिक्षक ओ. पी. भारद्वाज (वय 82) यांचे शुक्रवारी (दि. 21) आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय बॉक्सिंग विश्वाला मोठा धक्का बसला आहे. 10 दिवसांपूर्वी भारद्वाज यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. भारद्वाज यांचे मित्र आणि माजी बॉक्सर टी. एल. गुप्ता यांनी पीटीआयला ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारद्वाज यांनी 2008 मध्ये कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना दोन महिने बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले होते. भारद्वाज यांना 1985 मध्ये बालचंद्र भास्कर भागवत ( कुस्ती) आणि ओएम नांबियार ( अॅथलेटिक्स) यांच्यासोबत द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविले होते. भारद्वाज यांनी 1968 ते 1989 या कालावधीत भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होते, तसेच ते निवड समितीचे सदस्यही होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंनी आशियाई, राष्ट्रकुल आणि दक्षिण आशियाई स्पर्धेत पदकं पटकावली होती. भारद्वाज हे पाटियालाच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे पहिले चीफ इंस्ट्रक्टर होते. बॉक्सिंगचे माजी राष्ट्रीय प्रशिक्षक जी. एस. संधू यांनीही ओ. पी. भारद्वाज यांना श्रंद्धाजली वाहिली आहे.