नवी दिल्ली : वृत्तसंस्था- पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांना भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सेनेच्या चिनार कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी बुधवारी म्हटलं की, “पाकिस्तानला त्यांचे सर्व प्रयत्न करू द्या. आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ जे त्यांच्या पिढ्या लक्षात ठेवतील. आम्ही पाकिस्तानचे 1971 पेक्षाही वाईट हाल करू.”
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्यांच्या अनेक नेत्यांनी आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. नुकताच इम्रान खान यांनी आपल्या एका लेखात इशारा दिला होता. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. अनेक देशांसमोर पाकने हा मुद्दा उचलून धरला आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी त्याच्या वाट्याला निराशाच आली आहे.
सेनेने अटक केले 2 आतंकवादी
लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन आणि जम्मू काश्मीरचे पोलीस ए़डीजी मुनीर खान यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं की, भारतीय सेनेने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या दोन आतंकवाद्यांना अटक केली आहे. दोन्ही आतंकवाद्यांना रात्री उशीरा बारामूलामधून ताब्यात घेण्यात आलं. पकडलेल्या आतंकवाद्यांचा व्हिडीओही पत्रकार परिषदेत दाखवण्यात आला. खलील अहमद आणि मोजाम खोकर असं या पकडलेल्या आतंकवाद्यांची नावे आहेत.