पुणे : बहुजननामा ऑनलाइन – बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या एकाला चतुशृंगी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. रोहित सुरेश धोत्रे (वय 21, रा. पांडवनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालन्यासाठी स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेला सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान चतुशृंगी पोलीस हद्दीत गस्त घालत असताना माहिती मिळाली की, रोहित धोत्रे हा येथील उतारा जिमजवळ थांबला असून, त्याच्याजवळ पिस्तुल आहे.
यानुसार वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार लांबतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन जाधव, महेश भोसले, कर्मचारी तेजस चोपडे, प्रकाश आव्हाड, शैलेश सुर्वे व त्याच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस मिळून आले. त्याने हे पिस्तुल कोठून आणि कशा साठी आणले याचा तपास सुरू आहे.