सत्तेत आल्यास तर ‘चौकीदारा’ला तुरुंग पाठवणार

नरेंद्र मोदी
April 5, 2019
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान नव्हे, तर खराखुरा ‘चौकीदार’ करा. शेतकरी, गरीब, मजुरांकडे चौकीदार राहात नाहीत. चोरीचा पैसा असलेल्या लोकांकडे  चौकीदार आहेत. राफेल व्यवहार पंतप्रधानांनीच केल्याचे संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ही चोरी लहान नाही. निवडणुकीच्या निकालानंतर या प्रकरणाची चौकशी करून चौकीदाराला कारागृहात टाकण्यात येईल, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे .
 नागपुरातील कस्तूरचंद पार्क येथे उमेदवार नाना पटोले व रामटेकमधील उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आले होते. राहुल गांधी यांनी आपल्या  घणाघाती भाषणात अनिल अंबानी, नीरव मोदी यांच्यावरून मोदी यांच्यावर लक्ष्य केले. राहुल म्हणाले, ‘देशातील पाच कोटी गरीब कुटुंबांना प्रत्येकी ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन देताच राज्यकर्त्यांच्या पोटात दुखू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा पैसा कुठून आणणार, असा लगेच सवाल केला. साडेतीन लाख कोटी बुडवणाऱ्या, ४५ हजार कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या अनिल अंबानी यांना विमानाचे जगातील सर्वात मोठे कंत्राट दिले, रामदेवबाबा यांना जमीन भाजप सरकारने दिली. त्यावेळी पैशांचा प्रश्न का केला नाही.’ अनिल अंबानी यांच्याकडचा पैसा गरिबांच्या खिशात जाईल. ‘न्याय’ योजनेच्या माध्यमातून काँग्रेसने गरिबी निर्मूलनासाठी सर्जिकल स्ट्राइकचा निर्धार केला आहे, असे ते यावेळी म्हणाले.
आगामी लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पाच कोटी गरीब कुटुंबांना वर्षाला प्रत्येकी ७२ हजार रुपये कसे मिळतील याचा ताळेबंद उलगडून दाखविला. हे शक्य आहे की नाही, हे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांच्यासारख्या तज्ज्ञाकडून खातरजमा करू शकता, असेही राहुल म्हणाले. गरिबांना देण्यात येणारे ७२ हजार रुपये कुटुंबातील प्रमुख महिलेच्या खात्यात जमा करण्यात येतील. त्याचप्रमाणे लोकसभा, विधानसभा तसेच, सरकारी नोकरीत महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.