सातारा: बहुजननामा ऑनलाईन – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आमदार दिलीप मोहिते-पाटील यांची बदनामी करण्यासाठी रचलेले Honey trap चे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस आले. विशेष म्हणजे साता-यातील एका युवतीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला असून या प्रकरणी सातारा तालुका पोलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यात पुणे जिल्ह्यातील दोघांचा तर साता-यातील एकाचा समावेश आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण,जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आमदार मोहिते- पाटील यांचे पुतणे मयुर साहेबराव मोहिते-पाटील (वय 35 रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस चौकशीत तरुणीने दिलेली माहिती अशी की, साताऱ्यात राहणारा सोमनाथ शेडगे हा तिचा मित्र असून त्याच्या ओळखीने शैलेश मोहिते व राहुल कांडगे हे दोघे दि.12 एप्रिल रोजी साताऱ्यात संबंधित युवतीला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी तिला आपल्याला आमदार मोहिते -पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत पाहिजे असल्याचे सांगितले. त्या बदल्यात संशयितांनी त्या युवतीला काही रोख रक्कम व पुण्यात एक फ्लॅट देण्याचे कबुल केले. त्यासाठी तुला त्यांच्याकडे नोकरीच्या बहाण्याने जायचे असून त्यानंतर त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांची बदनामी करावी लागेल, असा प्लॅन संशयितांनी युवतीला सांगितला.
त्याबदल्यात तीला वेळोवेळी एकूण 90 हजार रूपये दिले गेले. मात्र, हा सगळा प्रकार मनाला न पटल्याने त्या युवतीने आमदारांचे पुतणे व तक्रारदार मयुर यांना फोन करून सांगितले. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी तत्काळ संबंधित युवतीकडे कसून चौकशी करून यातील काही महत्त्वाचे पुरावे हाती घेतले. त्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नाही. सातारा तालुका पोलीस तपास करत आहेत.