मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. याचे रुप असेच राहण्यासाठी धुलिवंदन व रंगपंचमीला घातक रासायनिग रंगांचा वापर, पाण्याचे फुगे व पाण्याचा वापर टाळुन प्रदूषणविरहीत आणि सुकी होळी साजरी करू या… तसेच होळी लहान करा, पोळी दान करा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत करण्यात आले आहे.
ग्रँट रोड ते विरारपर्यंत सोसायटीतून स्वतःहून फोन करून नागरिकांनी होळीचा नैवेद्य म्हणून जाळल्या जाणाऱ्या पोळ्या अंनिसच्या कार्यकर्त्यांना दिल्या. दहिसरमधील काही सोसायटीतील नागरिकांनी नैवेद्यासाठी स्वतंत्र भांडे ठेवून त्याला ‘नैवेद्य कुंड’ असे नाव दिलं होतं. मीरा रोडच्या ‘सुंदर दर्शन’ सोसायटीमध्ये एकसुद्धा पोळी होळीत टाकली गेली नाही, याऐवजी सर्व पोळ्या गोळा करून त्यांनी कार्यकर्त्यांना पोहोचवल्या, अशी माहिती दहिसरचा कार्यकर्ता हरिश खूप अभिमान आणि समाधानाने सांगत होता.
या उपक्रमासाठी संदेश पाटील आणि अविनाश सूर्यवंशी यांनी प्रचंड मेहनत घेऊन तिथल्या स्थानिकांचं प्रबोधन केले. दादर परिसरात योद्धा मित्र मंडळ, आ भा परिवर्तनवादी संघटना आणि अंनिसच्या कार्यकत्यांनी पोळ्या गोळा करून फुल मार्केट आणि टाटा हॉस्पिटल परिसरात रस्त्यावर राहणाऱ्या लोकांमध्ये वाटल्या.त्या गरजूंपर्यंत पोहोचवल्याचा आनंद सर्व कार्यकर्त्यांना झाला आहे.