कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – फुलेवाडी येथील गुऱ्हाळगृहाच्या मालकाने ॲडव्हान्स म्हणून दिलेले पैसे वसूल करण्यासाठी वारंवार तगादा लावला. या त्रासाला कंटाळून कामगाराने विष पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुऱ्हाळमालक सचिन शामराव जाधव-कलिकते (रा. फुलेवाडी) याच्याविरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जाधव यांच्या फुलेवाडी येथील गुऱ्हाळगृहावर बळवंत कांबळे (वय ४५) हे काम करत होते. त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. कांबळे यांचा भाऊ रंगराव राणोजी कांबळे (वय ७५, रा. कोदे खुर्द, ता. गगनबावडा) यांनी फिर्याद दिली. बळवंत कांबळे यांनी पैसे वसुलीचा तगादा आणि गुऱ्हाळमालकाच्या त्रासाला कंटाळून कीटकनाशक प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुऱ्हाळमालक जाधव यांनी फसवणूक करून त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला, तसेच शिवीगाळ करून कोंडून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे.