यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने तालुक्यातील हलबी जमातीचे नागरिकांना जुन्याच जात प्रमाणपत्रावर प्रकरण सहा महिन्यांत निकाली काढून प्रमाणपत्र निर्गमित करावे, असे आदेश जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अमरावतीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. त्यामुळे हलबी जमातीला न्याय मिळाला असून, लवकरच जात वैधता प्रमाणपत्र मिळणार आहे.
हलबा, हलबी या जमातीचे लक्ष्मीकांत नंदनवार, प्रकाश काटोले, रमेश पराते, पूजा काटोले, शुभम नंदनवार, अशोक नंदनवार यांनी सन २०११ ते २०१३ चे कालावधीत जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अमरावतीकडे अर्ज केला होता. परंतु, समितीने हेतूपुरस्सर सर्वांना जात प्रमाणपत्र विहित नमुन्यात नसल्याच्या कारणावरून जात वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. त्यामुळे सर्वांनी उच्च न्यायालयात ॲड. जयकुमार वानखेडे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.
समाजाचे कागदोपत्री पुरावे तपासून न्यायालयाने आदेश पारित केले आहे. यामध्ये अर्जदारांनी समितीकडे विहीत नमुन्यात जात प्रमाणपत्र सादर केले असून, यावर प्रकरणावर समितीने सहा महिन्यांत निर्णय द्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. बी. शुकरे आणि एस. एम. मोडक यांच्या पीठाने समितीला दिला आहे. जात प्रमाणपत्रावर आवश्यक माहिती असेल तर ते विहीत नमुन्यात असणे बंधनकारक नाही, असे या आदेशात म्हटले आहे. सर्व अर्जदारांना समितीने कार्यालयात बोलावून त्यांचे अर्ज सहा महिन्यांत निकाली काढावे, असे आदेश दिले.