चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – चंद्रपूर जिल्हा लोहार, गाडी लोहार व तत्सम जाती विकास संस्था, चंद्रपूरच्या वतीने महिलादिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक विश्वकर्मा भवनात करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. गेडाम यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी शारदा बावणे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनू दहेगावकर, प्रा. देवराव ठावरी, आनंद अंगलवार, शिक्षिका लता सोनटक्के, लोहार समाज संघटनेचे माजी अध्यक्ष भास्कर कामटकर, नागपूरचे उपाध्यक्ष एस. एन. शेंडे, चंद्रपूरचे अध्यक्ष एस. एस. कामटकर, आनंद अंगलवार, आनंद बावणे, उपाध्यक्ष हरीदास चंदनखेडे, आर. के. पराये, मंदा हंसकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ आणि भगवान विश्वकर्मांच्या प्रतिमेला मालार्पण करून करण्यात आली. यावेळी शिक्षिका अपर्णा यांनी सांगितले की, महिला अनेक आव्हाने पेलून जगत असते. त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते.
अनु दहेगावकर यांनी, महिलांच्या संरक्षणासाठी भारतीय संविधानाने अनेक कायदे तयार केले आहेत. परंतु, महिलांना अद्यापही न्याय मिळाला नाही. महिलांनी मूल आणि चूल हे न बघता स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे होऊन समाजसेवा केली पाहिजे, असे आवाहन केले. देवराव ठावरी यांनी, स्त्रीयांनी पुरुष जातीला न घाबरता स्वत:च्या पायावर उभे राहून समाजसेवा केली पाहिजे. अनेक क्षेत्रात आज महिलाचे मोठे स्थान आहे. प्रत्येक क्षेत्र महिलांनी काबिज केले आहे. प्रा. गेडाम यांनी महिलादिनाचे महत्त्व पटवून दिले. तर अध्यक्षीय भाषणात शारदा बावणे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन विजय पोहनकर यांनी केले. तर आभार आनंद बावणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंदा हंसकर, शारदा बावणे, वाघमारे, हजारे, धाबेकर, दुर्वे, पोहनकर आदींसह उपस्थित महिलांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा लोहार, गाडी लोहार विकास संस्थेच्या पदाधिकारी आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.