मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त सोमवारी (दि. 16) शेअर बाजार बंद असला तरी कमॉडिटी बाजारात संध्याकाळी 5 वाजता ट्रेडींग सुरु झाले आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात (gold Silver Rate Fall Today ) मोठी घसरण झाली आहे. सध्या सोने 586 रुपयांनी स्वस्त झाले असून चांदीच्या भावात एक किलोला 1062 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात होत असलेले चढउतार पाहता सोन्यात गुंतवणूक करावी की नाही असा प्रश्न ग्राहकांच्या मनात उपस्थित होत आहे.
सणासुदीच्या निमित्ताने सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र आज त्यात नफावसुली झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये ( Multi Commodity Exchange) सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 50, 400 रुपये झाला आहे.त्यात 586 रुपयांची घसरण झाली. त्याआधी आजच्या सत्रात सोन्याने 50,150 चा स्तर गाठला होता. एक किलो चांदीचा भाव 62, 515 रुपये झाला असून त्यात 1286 रुपयांची घसरण झाली आहे.
शनिवारी बाजारात झालेल्या एक तासांच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. सोने 0.25 टक्कयांनी वाढले आणि 10 ग्रॅमचा भाव 51,050 रुपये झाला. चांदीच्या भावात 0.32 टक्के वाढ झाली होती आणि एक किलो चांदीचा भाव 63,940 रुपये झाला.
goodreturns.in या वेबसाईटनुसार सोमवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 49,960 रुपये आहे. तर 24 कॅरेटचा भाव 50, 750 रुपये आहे. त्यात शनिवारच्या तुलनेत 210 रुपयांची घसरण झाली आहे. दिल्लीत 22 कॅरेटचा भाव 49,750 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 54,270 रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना 22 कॅरेट सोने खरेदीसाठी 49, 080 रुपये मोजावे लागत आहेत. तर 24 कॅरेटचा भाव 54,420 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोने प्रती 10 ग्रॅमसाठी 48, 210 रुपये आहे. 24 कॅरेटसाठी तो 52, 590 रुपये आहे.
जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस 1847. 87 डॉलर असून त्यात 0.66 टक्क्यांची घसरण झाली आहे. चांदीवर देखील नफावसुलीचा दबाव असून प्रती औंस चांदीचा भाव 24.46 डॉलर आहे.