अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या काळेवाडीत झालेल्या विवाह सोहळ्यात व-हाडी महिलांना वेगळीच भेट मिळाली. महिलांना सॅनिटरी नॅपकिन भेट देण्यात आले. लग्नात आशीर्वादाची भाषणेही नव्हती. त्याऐवजी मासिक पाळीत महिलांनी काय काळजी घ्यावी? ही भाषणे होती.
बीड जिल्ह्यातील भारत गडदे आणि प्रतीक्षा पाताळे या दोघांचा मोहोजदेवढे ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या काळेवाडी येथे विवाह झाला. दोघांचेही परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. काळेवाडी येथील वस्तीवर बहुतांश धनगर कुटुंब राहतात. भारत हा युवा चेतना फाउंडेशन या संघटनेचा सदस्य आहे. या संघटनेतील युवकांनी आजवर अशाच आगळ्या वेगळ्या प्रथा लग्नात रुढ केल्या आहेत.
भारतच्या लग्नात सॅनिटरी पॅडचे वाटप करुन महिलांचे मासिक पाळीत घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करावयाचे ठरले. त्यानुसार अमर कळमकर, योगेश काकडे, प्रियदर्शनी पोळ, प्रकाश मानव, अशोक चिंधे, शुभम गोडसे, पूजा केरकळ, राणी कळमकर, ज्ञानेश्वर आघाव, डॉ. पूजा आहिर, गणेश ठोंबरे या कार्यकर्त्यांनी लग्नाच्या अगोदर वधू-वरांच्या आईवडिलांची मानसिक तयारी केली. त्यानंतर दोन दिवस अगोदर गावात जाऊन गावक-यांना व महिलांना विश्वासात घेतले. तो वर ब-याच महिलांना सॅनिटरी पॅड म्हणजे काय? हे माहिती नव्हते. हे पॅड भेटवस्तूच्या स्वरुपात बंदिस्त करुन लग्नमंडपात वाटण्यात आले.
लग्नात दिला अनोखा आहेर ..
सध्याच्या काळात तंत्रज्ञानामुळे सॅनिटरी पॅडसाठी व्हेंडिंग मशिनचा वापर होताना दिसत आहे . पैसे टाकल्यावर सॅनिटरी पॅड मिळेल असे व्हेंडिंग मशिनही लग्न समारंभात गावाला भेट देण्यात आले. यावेळी टेंड्रिल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आरती शर्मा यांनीही महिलांना मासिक पाळी व सॅनिटरी पॅडबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे महिला, पुरुषांनी न लाजता हे सर्व मार्गदर्शन आनंदाने ऐकले. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या लग्नाची सध्या चर्चा सुरु आहे.