मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी नागरिकांना पीएम केअर फंडात मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. अब्जावधी रुपये पीएम केअर्स फंडात जमा झाले. अहमदनगरच्या विजय पारेख यांनीही या फंडात मोठी रक्कम जमा केली होती. पण त्यांच्या आजारी आईला रुग्णालयात बेड मिळाला नाही. त्यामुळे पारेख यांनी आपली शोकांतिका ट्विटर अकाऊंवरुन मांडली आहे. मी पीएम केअर फंडात 2.51 लाख जमा केले होते. पण मरणाच्या दारातील माझ्या आईला बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे, मल्ला मार्गदर्शन करा की, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मी कुठे मदत करु, ज्यामुळे मला बेड मिळेल अन् मी कुणाला गमावणार नाही, असे भावनिक ट्विट पारेख यांनी केले आहे.
https://twitter.com/VeejayParikh/status/1396834006897815562
पारेख यांचे भावनिक ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. केवळ 12 तासांत 14 हजार लाईक आणि 6,200 रिट्विट झाले आहेत. विशेष म्हणजे पारेख यांचे यापूर्वीचे ट्विट पाहिल्यास ते भाजपा समर्थक असल्याचे दिसून येत आहे.तसेच, त्यांनी 10 जुलै 2020 रोजी ही रक्कम जमा केल्याची पावतीही ट्विटरवरुन शेअर केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शन मिळविण्यासाठी मोठा संघर्ष नातेवाईकांना करावा लागला आहे. रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगाच रांगा लागल्याचे पाहायला मिळाले होते. तर मृत्यूदरही चांगलाचा वाढल्याचे दिसून आले.