नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना आपल्या सोबत कोण-कोणत्या आपत्ती घेऊन आला आहे ते अजूनही समजत नाही. संपूर्ण देश दुसर्या लाटेतून सावरण्यासाठी धडपडत असताना रोज नवनवीन आजार बाहेर येत आहेत. अगोदर ब्लॅक फंगस, नंतर व्हाईट फंगस आणि आता उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका 45 वर्षाच्या रूग्णात यलो फंगसचे प्रकरण समोर आले आहे. हा फंगस इतर दोन फंगसपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे म्हटले जात आहे. रूग्णावर सध्या शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. ब्रिज पाल त्यागी यांच्या निर्देशात उपचार सुरू आहेत.
डॉ. त्यागी यांचे म्हणणे आहे की, रूग्णामध्ये तिन प्रकारचे ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगस आढळून आले आहेत. त्यांनी सांगितले की, 45 वर्षाच्या या रुग्णाचा सायनस सीटी स्कॅन पूर्णपणे सामान्य होता. परंतु जेव्हा एंडोस्कोपी करण्यात आली तेव्हा आम्हाला समजले की, रूग्णामध्ये तीन प्रकारचे फंगस आहेत. यलो फंगस सामान्यपणे सापांमध्ये आढळतो.
यलो फंगसच्या संसर्गाचे कारण
असे मानले जाते की, स्वच्छतेची कमतरता आणि प्रदूषित खाणे-पिणे यलो फंगसचे कारण असू शकते, सोबतच स्टेरॉईड आणि अँटी फंगल औषधांचा जास्त वापर सुद्धा याचे कारण ठरू शकते. ज्यामुळे कोविड-19 मधून बरे झालेल्या लोकांना सुद्धा हा संसर्ग होत आहे.
अशी आहेत लक्षणे
सुरुवातीला, यलो फंगसच्या रूग्णांना खुप जास्त थकवा, भूक न लागणे किंवा कमी लागणे आणि वजन कमी होण्याची तक्रार असते. नंतर रूग्णांचे वजन वेगाने कमी होऊ लागते. ज्यामध्ये शरीराच्या आतील भागात रक्तस्राव आणि ऑरगन फेल्युयरचा धोका असतो.
आतापर्यंतचे उपचार
अँटी फंगल ड्रग, अँफोटेरिसिन-बी यलो फंगसच्या प्राथमिक उपचारात वापरले जाते. हे तेच इंजेक्शन आहे ज्याचा वापर देशात ब्लॅक आणि व्हाईट फंगसच्या उपचारात वापरले जात आहे.
यलो फंगस जास्त धोकादायक
डॉक्टर सांगतात की, यलो फंगसच्या प्रकरणात रूग्णांच्या आतील भागात संसर्ग पसरण्यास सुरूवात होते. यासाठी रूग्णांना सल्ला दिला जातो की, भूक न लागणे, शरीरात वेदना किंवा थकवा, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्यासह उपचार सुरू केले पाहिजेत.
तिकडे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले की, 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत म्यूकरमायकोसिसची 5,424 प्रकरणे समोर आली आहेत. अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे.