मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मध्यप्रदेशातील ५२ पैकी ३३ जिल्हे पुराच्या सपाट्यात सापडले आहेत. राज्यात एक हरदा नावाचा जिल्हा आहे. येथील परिस्थितीत एवढी वाईट आहे की, घरापासून स्मशानभूमीपर्यंत पाणीच पाणी आहे. या पाण्यातून येथे एक अंत्ययात्रा काढण्यात आली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यात पुराची परिस्थिती अतिशय गंभीर असल्यामुळे येथे एक अंत्ययात्रा काढण्यासाठी गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. जवळ- जवळ छाती इतक्या पाण्यातून एक अंत्ययात्रा काढली गेली. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोमवार ९ सप्टेंबर रोजीचा आहे.
मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यात अति पावसात पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून एक अंत्ययात्रा काढली गेली. सोमवारी जिल्ह्यातील सुखनी नदीला पूर आला होता. या गावात एका राहुल नावाच्या २० वर्षाच्या मुलाचा आजारामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी संततधार पावसामुळे गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. जोरात पडत असलेल्या पावसात गावातील लोकांनी अंत्ययात्रा काढली आणि अंतिम संस्कार केले. या दरम्यान गावातील एका मुलाने याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.