नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज सोमवारी 84 व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याने हॉस्पीटलमध्ये दाखल होते. ते कोरोना पॉझिटिव्ह सुद्धा आढळले होते, तसेच त्यांची सर्जरीसुद्धा झाली होती.
प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांच्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मुखर्जी यांनी सैन्य हॉस्पीटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना 10 ऑगस्टला हॉस्पीटलमध्ये भरती केले होते. आज सकाळच्या आरोग्य बुलेटिनमध्ये म्हटले होते की ते कोमामध्ये असून व्हँटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
Sad to hear that former President Shri Pranab Mukherjee is no more. His demise is passing of an era. A colossus in public life, he served Mother India with the spirit of a sage. The nation mourns losing one of its worthiest sons. Condolences to his family, friends & all citizens.
— President of India (@rashtrapatibhvn) August 31, 2020
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, माजी राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी स्वर्गवासी झाल्याचे समजले आणि हृदयावर आघात झाला. त्यांचे देहावसान हे एका युगाचा अंत आहे. श्री प्रणव मुखर्जी यांचे कुटुंबिय, मित्र आणि सर्व देशवासीयांच्या दु:खात सहभागी आहे. सार्वजनिक जीवनात महान उंची गाठणारे प्रणवदा यांनी भारतमातेची सेवा एखाद्या संताप्रमाणे केली. देशाचा एक सुपूत्र गेल्याने संपूर्ण राष्ट्र शोकाकुल आहे.
उपराष्ट्रपती वैंकय्य नायडू यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. उपराष्ट्रपती सचिवालयाने नायडू यांचा संदर्भ देत ट्विट केले की, मुखर्जी यांच्या निधनाने देशाने एक अनुभवी राजकीय नेता गमावला आहे. ते सामान्य पार्श्वभूमीवरून आपल्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणामुळे देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदापर्यंत पोहचले. त्याच्या शोकाकुल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती.
सिटीजन मुखर्जी या त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुखर्जी यांनी 10 ऑगस्टला जगाला ही माहिती दिली की ते कोविड-19 ने संक्रमित झाले आहेत. ही त्यांची शेवटची पोस्ट होती आणि जनतेसाठी शेवटचे शब्द सुद्धा.