बहुजननामा ऑनलाईन – फ्लिपकार्टने आता ग्राहक वाढवण्यासाठी नवीन योजना आणली आहे. फ्लिपकार्टने ग्राहक वाढवण्यासाठी मोफत व्हिडिओ सेवा सुरु केली आहे. फ्लिपकार्टवरून आता ग्राहकांना मोफत चित्रपट, व्हिडिओ आणि वेबसिरीज पाहता येणार आहे. फ्लिपकार्टने छोट्या गावातील आणि छोट्या शहरातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतातील १६ कोटी लोकांना फ्लिपकार्टच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.
पाहियल्यांदाच इंटरनेट हाताळणाऱ्यांसाठी व्हिडिओ, इंटरनेट आणि मनोरंजन हे तीन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. यामुळे फ्लिपकार्टने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने दिली आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओशी फ्लिपकार्टचा सामना होणार आहे. परंतु यात सगळ्यात महत्त्वाचा फरक असणार तो म्हणजे अॅमेझॉन प्राईमवरून व्हिडिओ पाहताना पैसे मोजावे लागतात पण फ्लिपकार्टवर हेच व्हिडिओ पाहताना काहीच पैसे मोजावे लागणार नाहीत. फ्लिपकार्टच्या या सेवेअंतर्गत ग्राहकांना चित्रपट, शॉर्ट व्हिडिओ आणि वेब सिरीज पाहता येणार आहे. ही सेवा ज्या ग्राहकांकडे अॅप आहे त्यांनाच मिळणार आहे. या सेवेचा आनंद ग्राहकांना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर घेता येणार नाही.
यासाठी ओरिजनल कंटेन्ट मिळवण्यासाठी कोणासोबत पार्टनरशीप करणार आहे याविषयी कंपनीने अद्यापतरी काही खुलासा केला नाही. सध्या व्हिडिओ स्ट्रीमिंगची सेवा चाचणी कंपनीतील काही मोजक्याच ग्राहकांसोबत सुरु आहे. परंतु पुढील २० दिवसात सर्व ग्राहकांना ही सेवा मिळू शकणार अशी माहिती कंपनीने दिली आहे.