पुणे : बहुजननामा ऑनलाईन – फ्लॅटचा ताबा वेळेत न देता फसवणूक केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकासह संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळ ब्रदर्स कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक सुरेश रमण भुजबळ (रा. कोथरूड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित देशकर (वय ४०, रा. वाकड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहखरेदी विक्री प्रदर्शनात रोहित यांची भुजबळ ब्रदर्सशी सात वर्षांपूर्वी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी भुजबळ ब्रदर्स कन्स्ट्रक्शन कंपनीकडून कोंढवा भागात बांधण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पाची माहिती घेतली. त्यानंतर फ्लॅट खरेदीसाठी रोहित यांनी रोख ३६ लाख ५१ हजार ७४० रुपये भुजबळ ब्रदर्स बांधकाम व्यावसायिक कंपनीकडे जमा केले.
त्यांच्याकडून रोहित यांना वेळेत फ्लॅटचा ताबा मिळणे अपेक्षित होते. मात्र त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे फसवणूक प्रकरणी भुजबळ ब्रदर्स विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बर्गे करत आहेत.