नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीची दिग्रसमध्ये सभा पार पडली. या सभेतील आपल्या भाषणात अॅड. आंबेडकर यांनी ‘आमची सत्ता आल्यास निवडणूक आयुक्ताला दोन दिवस जेलमध्ये टाकू’ असे विधान केले होते.
निवडणूक आयोगाने प्रचारात पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राईक याचा उल्लेख करण्यास मनाई करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी हे विधान केले होते. या विधानाच्या अनुषंगाने दारव्हाच्या उपविभागीय निवडणूक निर्णय अधिका-यांकडून अहवाल मागण्यात आला. त्यात हे विधान केल्याचे स्पष्ट असल्याने आंबेडकरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. आयोगाच्या वतीने पंचायत समितीचे शाखा अभियंता विवेक जोशी यांनी यासंबंधी फिर्याद नोंदविली असून प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध भादंवि ५०३, ५०६, १८९ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे .