मुंबई बहुजननामा ऑनलाइन : जानेवारी २०१८ मध्ये मंत्रालयात विष प्राशन केलेले धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या संबंधि तीन जणांविरोधात चौकशी समितीने FIR दाखल करण्याची शिफारस केली आहे. या प्रकरणात स्थानिक जमीन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे, तहसील अधिकारी रोहिदास खैरनार आणि मध्यस्थ दत्तात्रय देसले या तिघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी, अशी शिफारस चौकशी समितीनं केली आहे. या तिघांकडून कामात अनियमितता झाल्याचा ठपका चौकशी समितीने लावला आहे.
धुळे जिल्ह्यातील विखरण (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी भूसंपादनात फळबागाचा मोबदला न मिळाल्याने मंत्रालयात विष प्राशन केले होते. नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याचप्रकारणी माजी जिल्हा न्यायाधीश श्याम दरणे यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय चौकशी समितीने आपला अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाला सादर केला आहे. धर्मा पाटील आत्महत्या संबंधित तीन जणांविरोधात एफआयआर नोंदवण्याची चौकशी समितीची शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २२ ऑगस्ट रोजी दोंडाईचा दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी धर्मा पाटील यांच्या ७२ वर्षीय पत्नी सखूबाई पाटील यांना त्यांच्या घरी पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. सखूबाई आणि त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी काही हालचाल करू नये, म्हणून त्यांना राहत्या घरी पोलिनांनी स्थानबद्ध केले होते. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी दोन महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या दरम्यान सखूबाई पाटील यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतरही न्याय न मिळाल्याने पाटील कुटुंबिय व्यथित आहे.