भद्रावती : बहुजननामा ऑनलाइन – मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या सामाजिक संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा ‘राज्यस्तरीय आदर्श युवती महाराष्ट्र यूथ आयडाॅल क्रीडारत्न अवाॅर्ड २०२०’ हा पुरस्कार भद्रावती तालुक्यातील शेगाव (खुर्द) येथील प्रियंका पांडुरंग गायकवाड या युवतीला जाहीर झाला असून, खा. बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते व आ. प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच तिला बहाल करण्यात आला.
सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रियंका गायकवाड हिने ‘जंप रोप’ या खेळात औरंगाबाद येथील राज्यस्तरीय स्पर्धेत ‘रौप्य’ पदक मिळविले, तर जम्मू-काश्मीर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही तीने ‘रौप्य’ पदक प्राप्त केले.
तसेच दि.९ ऑगस्ट २०१९ रोजी तिला महाराष्ट्र आदिवासी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ती सध्या नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाला शिकत आहे. शेगाव (खुर्द) सारख्या लहानशा गावातील खेळाडू युवतीला राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने गावक-यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.