पुणे : बहुजननामा ऑनलाइन – गुळाऐवजी दारू गाळता, गुन्हा दाखल करतो असे सांगून गुऱ्हाळचालकाला लुबाडणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला यवत पोलिसांनी जळगावमधून पकडून आणले. सरफराज कलिंदर तडवी असे त्याचे नाव आहे. तब्बल ४ महिने तो पोलिसांना हुलकावण्या देत होता. ही घटना दौंड तालुक्यातील दापोडी येथे ५ मार्च २०१९ ला घडली होती.
एका गुऱ्हाळघरावर आरोपी सरफराज कलिंदर तडवी सोबत पाच लोकांना घेऊन स्कॉर्पिओ गाडीमध्ये आले. गुऱ्हाळमालक नशीब कुर्बान मलिक (रा. दापोडी, ता. दौंड) व ग्रामस्थ मोहन खंडू रुपनवर यांना आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून आपण गुऱ्हाळघरामध्ये गूळ तयार करण्याऐवजी दारू तयार करीत आहात. त्यामुळे आपल्याला दंड करण्यात येत आहे, असा खोटा गुन्हा दाखल केला. प्रकरण मिटवण्यासाठी संबंधितांकडून ९८ हजार रुपयांची लाच घेतली होत त्यानंतर ते सीबीआय अधिकारी नसल्याचे समजल्यावर मलिक यांनी दौंड पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीतील शिवाजी शिर्के व सरफराज शेख (दोघे रा. दौंड), सागर नांदखिले, साजिद शेख व अक्षय भोसले (तिघे रा. गार, ता. दौंड) या आरोपींना पोलिसांनी अटक केली. पण त्यांचा मुख्य सुत्रधार सरफराज तडवी हा मात्र फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.
या घटनेनंतर तो मध्य प्रदेशातील इंदोर येथे राज शेट्टी असे नाव बदलून रहात होता. तेथे त्याने हॉटेल व्यवसाय सुरु केला. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत तेथे पोहचले. तेव्हा तो जळगावातील रावेर येथे असल्याचे समजले. तेथे त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्याला आणले.