बहुजननामा ऑनलाइन टीम : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी परळी येथील गोपीनाथगडावर नुकत्याच झालेल्या मेळाव्यात ‘माझा भरवसा धरू नका, मी केव्हाही पक्षांतर करू शकतो’, असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच असल्याचे समजले आहे. सध्या ते राज्याबाहेर असून राज्यात परतल्यानंतर यासंदर्भात संबंधितांशी चर्चा करुन 20 डिसेंबरपर्यंत त्यांचा प्रवेश सोहळा होईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.
खडसे दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना भेटून आले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईतही शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे खडसे शिवसेनेत जाणार की, ‘राष्ट्रवादीत’ ही चर्चा सुरु झाली होती. त्याचबरोबर कॉंग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खडसे कॉंग्रेसमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच आहे, असे मत व्यक्त केले. त्यामुळे खडसेंच्या प्रवेशासंदर्भात गूढ अधिकच वाढले. अखेर खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना छगन भुजबळांचे उदाहरण देण्यात आले. भुजबळ अडचणीत असताना पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.
तसेच त्यांना आता मंत्रिमंडळातही घेण्यात आले. खडसे यांनाही त्यांच्या पाठीशी ‘राष्ट्रवादी’ च्या नेतृत्वाने खंबीरपणे उभे राहण्याची हमी दिली आहे. याशिवाय मुक्ताईनगर मतदारसंघातील रचनेचा विचार करुन त्यांनी ‘राष्ट्रवादी’मध्ये जाण्याचे ठरविले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 20 डिसेंबरपर्यंत खडसेंची प्रवेशप्रक्रिया निश्चित होण्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे खडसे यांच्या प्रवेशामुळे ‘राष्ट्रवादी’ ला खानदेशसह थेट विदर्भातील मलकापूर, बुलडाणा व अकोला जिल्ह्यापर्यंत फायदा होणार आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ तर्फे त्यांना मंत्रिपद देण्याचेही निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु पदाचा विचार न करता केवळ पक्षकार्य म्हणून खडसे यांनी ‘राष्ट्रवादी’त प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
Visit : bahujannama.com