नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – मी नागपूरला माझ्या वयक्तिक कामासाठी आलेलो आहे, माझ्या पक्षांतराबाबत तुम्ही सर्व जण वेगळा अर्थ काढत आहात तसेच मी पक्ष बदलणार या सगळ्या अफवा आहेत, मुळात माझा पक्ष बदलण्याचा विचार नाही असे स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले होते. मात्र, खडसेंनी गुप्तपणे पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे खडसेंच्या पक्षबदलाच्या चर्चांना आणखी बळ मिळालंय.
विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या नागपुरात आहेत. त्यातच एकनाथ खडसे बुधवारी नागपुरात दाखल झाले होते. ते शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार खडसे आणि पवार यांची भेट झाल्याची माहिती आहे. दरम्यान, खडसेंच्या मुक्ताईनगरमधील भाजपा कार्यालयावरील मोदींचा फोटो असलेला भाजपाचा फलकही काढण्यात आला आहे. त्यामुळे, खडसे कितीही नाही म्हणत असेल तरी राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, या चर्चांना अधिक बळ मिळालंय. सध्या, विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नागपुरातच आहेत.
एकनाथ खडसे भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र, गेल्या ५ वर्षांत खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षासाठी इतका संघर्ष करूनही माझ्यावर अन्याय झाला, अशी भावना एकनाथ खडसेंनी वारंवार बोलून दाखविली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसेंनी जाहीर व्यासपीठावरून आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच, पंकजा पक्ष सोडून जाणार नाही, माझं सोडून द्या, असे म्हणत बंडखोरी होण्याची शक्यता त्यांनी सूचवली होती. त्यामुळे एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार की पक्षातच राहणार? हे येत्या काळात समजणार आहे. याच, पार्श्वभूमीवर अनेकदा एकनाथ खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा सुरु होती. पण खडसेंनी या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
Visit : bahujannama.com