मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू असून 14 एप्रिल 2023 पर्यंत स्मारकाचे लोकार्पण होईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवरांनी दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी आयोजित शासकीय कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी आंबेडकर स्मारकाबाबतची घोषणा केली.
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरही आंबेडकर स्माराकाबाबतची माहिती दिली आहे. इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू असून राज्य शासन त्याकडे दैनंदिन पद्धतीने लक्ष ठेवून आहे. एप्रिल 2023 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची शिकवण आमच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.
शरद पवारांचेही महामानवाला अभिवादन
महापरिनिर्वाण दिनानिमित्तचा शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते.