सांगली : बहुजननामा ऑनलाइन – जेष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांचा पंचाहत्तरीनिमित्त सांगलीत रविवारी (दि. 30) सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती सत्कार समितीच्यावतीने पत्रकात बैठकीत देण्यात आली. दुपारी 1 वाजता शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात डॉ. साळुंखे यांचा सत्कार होणार आहे. मराठी व मोडी लिपीतील मानपत्र, महात्मा फुले यांची पगडी, काठी, घोंगडे, सांगलीतील प्रसिद्ध हळद, गुळाची ढेप, बेदाणे आणि मिरजेची सतार देऊन त्यांचा सत्कार होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. माजी प्राचार्य व्ही. वाय. पाटील, धनाजी गुरुव, अॅड. के. डी. शिंदे, बाळासाहेब पाटील, नामदेव करगणे, सदाशिव मगदूम उपस्थित होते.
या कार्यक्रमास डॉ. गणेश देवी, भालकी मठाचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरु उपस्थित राहणार आहेत. दि. 30 जूनरोजी सकाळी 11 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून विचार दर्शन प्रबोधन रॅलीस सुरुवात होणार आहे. या रॅलीचे उद्घाटन हौसाताई पाटील, कुसुमताई नायकवडी, शांता कराडकर, प्रमिला लाड यांच्या हस्ते होणार आहे. रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सत्कार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
डॉ. साळुंखे यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात एक महिना प्रबोधनाचे विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. डॉ. साळुंखे यांच्या पुस्तकांबद्दल मान्यवरांची व्याख्याने आणि चर्चासत्रे या महिनाभरात आयोजित करण्यात आली होती. सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, आटपाडी, पलूस, जत, वाळवा, तासगाव, शिराळा या तालुक्यांमध्ये या प्रबोधन कार्यक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.