लातूर : बहुजननामा ऑनलाईन – लिंगायत महासंघ शाखा, लातूरच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली लातूर लोकसभा निवडणुकीसंदर्भात लातुरात बैठक संपन्न झाली. या बैठकीत लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. भविष्यात निवडून येणाऱ्या खासदारांनी समाजाचे प्रश्न सोडवावेत, अशी भावना कार्यकर्त्यांनी या बैठकीत मांडली. लिंगायत समाजात आरक्षणावरून नाराजी आहे. आमच्याबरोबर मागणी करणाऱ्या इतर समाजाला आरक्षण मिळाले, पण लिंगायतांना नाही. त्यामुळे पुढे काय करायचे यावर चर्चा झाली. मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाचाही प्रश्न सुटला नाही. सोलापूर विद्यापीठाला सिध्दरामेश्वराचे नावही दिले नाही. समाजाच्या भावना समजून घेणाऱ्या नेत्यांच्या पाठिशी आपण उभे टाकावे व प्रत्येक लिंगायत समाजबांधवांनी मतदानादिवशी आपले कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावावा, असे बैठकीत ठरले.
या बैठकीस शिवराज शेटकार, श्रीकांत महाजन, शंकर पाटील चिघळीकर, काशिनाथ मोरखंडे, माणिकअप्पा कोकणे, शिवाजी भातमोडे, माणिकप्पा मरळे, बाबूराव मुक्तापुरे, सुभाष शंकरे, विश्वनाथ मिटकरी, प्रभाकर धम्मगुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचलन माणिकप्पा मरळे यांनी केले, तर शिवराज शेटकार यांनी आभार मानले.