बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा आता भाजप प्रवेश जवळजवळ निश्चितच झाला आहे. मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाडिक यांचा प्रवेश संपन्न होण्याची शक्यता आहे. २५ ते ३० ऑगस्टच्या दरम्यान एका तारखेला हा प्रेवश होणार आहे. महाडिक यांच्या जवळच्या व्यक्तींच्या मते महाडिक यांची पक्ष प्रवेशानंतर त्यांना भाजप महाराष्ट्र प्रदेशमधील महत्त्वाचे पद दिले जाणार आहे.
युवा शक्तीच्या माध्यमातून धनंजय महाडिक हे समाजकारणात आले होते. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात युवा शक्तीच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. लोकसभा निवडणूक त्यांनी २०१४ मध्ये लढविली होती. महाडिक यांचे कुटुंब काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. यादरम्यान त्यांनी सदाशिवराव मंडलिक यांच्याशी दिलेला लढा हा सर्वांच्याच लक्षात राहिला. मात्र यात त्यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर ते शिवसेनेकडे फिरकलेही नाही.
लोकसभा निवडणूक झाल्यापासूनच महाडिक यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडावा यासाठी कुटूंबियांसह कार्यकर्त्यांतून दबाव वाढत आहे. त्याचबरोबर महाडिक यांच्याकडूनही यासंदर्भात हालचाली सुरु होत्या. महाडिक यांचे कटर विरोधक सतेज पाटील हे काँग्रेसमध्ये असल्याने ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत हे स्पष्ट आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महाडिक यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. अनेकवेळा पालकमंत्री पाटील यांनीही महाडिकांना पक्ष प्रवेशासाठी जाहीर ऑफर दिली होती. त्यामुळे महाडिक यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले आहे.