देहूरोड/पुणे : बहुजननामा ऑनलाइन – हॉटेलमध्ये जेवण मिळाले नसल्याच्या कारणावरु सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर घरात घुसून कोयत्याने वार केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाच्या आत्यावर देखील टोळ्याने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.1) रात्री साडेअकराच्या सुमारास पोर्टर चाळ, गुरुद्वारा जवळ, देहूरोड येथे घडली
आनंद कृष्णा नाडार (वय-23 रा. पोर्टर चाळ, गुरुद्वारा जवळ, देहूरोड) आणि आनंद यांची आत्या सिता अशी जखमी झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी आनंद नाडार यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सनी आठवाल (रा. एमबी कॅम्प देहूरोड), राहुल चंद्रमणी ओव्हळ (वय-28 रा. मदीना मज्जीद शेजारी, देहूरोड), अभिजित आठवाल, करण आठवाल यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे इतर दोन साथिदार फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र विकी जाधव यांचे हॉटेल आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजता त्यांनी हॉटेल बंद केले. हॉटेल बंद केल्यानंतर आरोपी त्या ठिकाणी जेवणासाठी आले होते. मात्र, हॉटेल बंद झाल्याने त्यांना जेवण मिळाले नाही. याच कारणावरून आरोपींनी फिर्यादी आनंद यांच्या घरासमोर येऊन घरावर दगड फेक केली. त्यावेळी आनंद हे घराबाहेर आले असता त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करून धक्काबुक्की केली.
आरोपींनी फिर्यादी यांना धक्काबुक्की करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन आरोपी सनी आठवाल याने त्याच्यासोबत आणलेल्या कोयत्याने फिर्यादी यांच्या मानेवर पाठिमागून वार केला. त्यावेळी फिर्यादी यांची आत्या सिता या भांडण सोडवण्यासाठी मध्ये आल्या असता त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार केले. तसेच आरडाओरडा करुन परिसरात दहशत पसरवून दुचाकीवरून पसार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर करीत आहेत.