बंगळूर – वृत्तसंस्था – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (ता. १९ ) स्वदेशी लढाऊ विमान तेजस एअरक्राफ्टमधून उड्डाण घेत इतिहास रचला. स्वदेशी लढाऊ विमानातून उड्डाण कऱणारे राजनाथ सिंह हे देशातील पहिले मंत्री आहेत. तेजस तीन वर्षांपूर्वी हवाई दलात रुजू झाले असून लवकरच अत्याधुनिक सुविधांनी युक्त आणि तंत्रज्ञान असणारे असे विकसित वर्जनही येणार आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस हा भारतीय हवाई दलाच्या ४५ व्या स्क्वाड्रन ‘फ्लाइंग ड्रॅगर्स’ चा भाग आहे.
या लढाऊ विमानाचे डिझाईन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि वैमानिकी विकास एजन्सीने विकसित केले आहे. वायुसेनेने डिसेंबर २०१७ मध्ये एचएएल ला ८३ विकसित तेजस जेट तयार करण्यासाठी नेमले होते. या विमानांची किंमत अंदाजे ५० हजार कोटी असल्याची माहिती मिळाली आहे.संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) यंदा २१ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे आयोजित एयरो शोमध्ये विमानाला शेवटचे यशस्वी परिचालन म्हणून मंजुरी जाहीर केली.
#WATCH Defence Minister Rajnath Singh flies in Light Combat Aircraft (LCA) Tejas, in Bengaluru. #Karnataka pic.twitter.com/LTyJvP61bH
— ANI (@ANI) September 19, 2019
डीआरडीओच्या मंजुरीनंतर लवकरच तेजस युद्धासाठी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. तेजसची रचना भारतात तयार करण्यात आली असून पाकिस्तान आणि चीन यांच्या संयुक्त प्रयत्नाने केलेल्या थंडरबर्डपेक्षा कितीतरी पटीने तेजस शक्तीशाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा तेजसच्या कामगिरीबद्दल चर्चा झाली तेव्हा पाकिस्तान आणि चीनने त्यांचे थंडरबर्ड्स काढून टाकले होते. तेजसमध्ये मिग -२१ विमाना मधील सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने बनवलेल्या या विमानाचे अधिकृत तेजस असे नाव माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी दिले होते. तेजस याचा अर्थ खूप शक्तिशाली ऊर्जा असा होतो.